Pages

Monday, August 29, 2011

दादासाहेब कन्नमवार



वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन् चळवळींसाठी चालणारी वृत्तपत्रे या बाबतीत फार मोठा अन्याय करीत असतात. महाराष्ट्रात असा अन्याय आचार्य अत्रे यांच्या 'मराठा' या दैनिकाने अनेकांवर केला आहे. ह.रा. महाजनी यांच्यापासून लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापर्यंत आणि यशवंतरावांपासून पुढे देशाच्या पंतप्रधानपदावर पोहोचलेल्या मोरारजीभाईंपर्यंत अनेकांच्या प्रतिमा अतिशय विकृत स्वरूपात मराठी मानसावर आचार्यांनी त्यांच्या समर्थ लेखणी आणि वाणीच्या द्वारे ठसविल्या आहेत. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती इ. बरोबरच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतील त्यांचा मोठा वाटा कायमचा स्मरणात राहणार असला तरी त्यांची ही कर्तबगारीही विसरता येण्याजोगी नाही. अत्र्यांच्या या कर्तृत्वाचा सर्वात मोठा व निरपराध बळी मारोतराव सांबशीव उपाख्य दादासाहेब कन्नमवार हा आहे.
अत्र्यांनी त्यांची यथेच्छ टवाळी केली. त्यासाठी अग्रलेखांपासून नाटकांपर्यंतचे सारे लेखनप्रकार हाताळले. संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी लढयाचे एक कर्णधार असलेल्या आचार्यांवर मराठी मानस मोहीत होते आणि त्या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री व नंतर मुख्यमंत्री झालेले कन्नमवार अत्र्यांसह त्यांच्या तमाम चाहत्यांच्या रोषाचे आणि टिंगलटवाळीचे विषय होते. कन्नमवारांचे दुर्दैव हे की त्या अपप्रचाराला आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्यायला आयुष्याने त्यांना पुरेसा वेळ दिला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कारकीर्दीला जेमतेम एक वर्ष पूर्ण होत नाही तोच त्यांचे निधन झाले आणि मराठी मनावरची त्यांची अत्रेकृत प्रतिमाच कायम राहिली.
दि. 24 ऑक्टोबर 64 या दिवशी कन्नमवारांचा मृत्यू झाला. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी हिऱ्यांच्या स्मगलिंगपासून अनेक गोष्टींना उत्तेजन दिले असा मोठा प्रवाद मुंबईतील टीकाखोर वृत्तपत्रांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात उभा केला होता. कन्नमवारांचे दारिद्रयोत्पन्न व दारिद्रयसंपन्न आयुष्य ठाऊक असणाऱ्या त्यांच्या वैदर्भीय व अन्य चाहत्यांना त्या प्रचारी प्रवादाने तेव्हा कमालीचे व्यथित केले होते. त्यांच्यावर कोणते तरी बालंट येणार किंवा तशाच एखाद्या आरोपावरून त्यांना बदनाम केले जाणार असे वाटू लागले असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांचे सहस्त्रावधी चाहते पार कासावीस होऊन गेले.
बरोबर एक महिन्याच्या अंतराने दादासाहेबांच्या जीवनावर साहित्यभूषण तु.ना. काटकर यांनी लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशन नागपूरच्या चिटणीस पार्कवर तेव्हाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या सोहळयासाठी चंद्रपूरहून आलेल्या मित्रांच्या समूहात मीही होतो. त्या भव्य समारंभाला हजर राहून दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाणारी बस पकडायला पुढे केंद्रीय अर्थखात्याचे राज्यमंत्री झालेले शांताराम पोटदुखे आणि मी नागपूरच्या जुन्या एस.टी. स्टँडवर आलो तेव्हा दादासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई त्या स्टँडवरच आम्हाला दिसल्या. हाती एक छोटीशी बॅग घेतलेल्या गोपिकाबाई एस.टी.च्या तिकिटासाठी सामान्य माणसांप्रमाणे रांगेत उभ्या होत्या. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीणबाई असलेल्या गोपिकाबाईंना तसे बेदखल उभे असलेले पाहून आम्ही गलबलून गेलो. मग आमच्यातल्या एकाने त्यांना जबरीनेच बसायला लावून त्यांची तिकिटे काढून आणली. मुंबईच्या टीकाखोर वर्तमानपत्रांनी रंगविलेली कन्नमवारांची विकृत प्रतिमा धुवून अन् पुसून काढायला तो प्रसंग पुरेसा होता.
दादासाहेब कोण होते? साऱ्या विदर्भात आपल्या हजारो चाहत्यांचा वर्ग त्यांनी कसा उभा केला? अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, अर्धवट शिक्षण, प्रस्थापित अन् धनवंत अशा साऱ्यांचा कडवा विरोध, या साऱ्यावर कोणत्याही दखलपात्र जातीचे पाठबळ नसताना मात करून त्यांनी विदर्भावर आपला एकछत्री अंमल कसा कायम केला? त्यांच्या शब्दाखातर विदर्भातील 54 आमदार स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा द्यायला आपापले राजीनामे घेऊन का उभे राहिले? भंडाऱ्यात मनोहरभाई पटेल, वर्ध्यात पाटणी अन् बजाज, चंद्रपुरात छोटूभाई पटेल व इतर आणि नागपुरात अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे व दादा धर्माधिकाऱ्यांपासून आर.के. पाटील यांच्यासह खरे-अभ्यंकरांच्या प्रतिष्ठित अनुयायांपर्यंतचे सगळे बुध्दीसंपन्न लोक राजकारणावर प्रभाव गाजवीत असताना त्या साऱ्यांच्या डोळयादेखत विदर्भाचे राजकारण कन्नमवारांनी ज्या अलगदपणे आपल्या ताब्यात आणले तो इतिहास खरे तर स्वतंत्रपणेच लिहिला गेला पाहिजे. त्या काळात खुद्द म. गांधी विदर्भाचे (सेवाग्रामचे) रहिवासी होते आणि महात्माजींचे मानसपुत्र स्व. जमनालाल बजाज विदर्भाच्या राजकारणावर नजर ठेवून होते ही गोष्टही हा इतिहास लिहिताना स्पष्टपणे ध्यानात घ्यावी लागणार आहे.
चंद्रपूरच्या भानापेठ नावाच्या साध्या वस्तीतील एका दरिद्री कुटुंबात दादासाहेबांचा जन्म झाला. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि कोणत्या धनवंत वा संख्यासंपन्न जातीचे पाठबळ नसलेल्या या साध्या माणसाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत केलेली वाटचाल कोणालाही थक्क करणारी आहे. कधीकाळी वृत्तपत्रे विकणाऱ्या व काँग्रेस कमेटीच्या बाहेर ठेवलेल्या बाकडयावर दिवस काढणाऱ्या मारोती कन्नमवारांच्या पत्नीने एकेकाळी वरोऱ्याच्या रस्त्यालगत खाणावळ चालवून आपली व आपल्या कुटुंबाची गुजराण करण्याचे प्राक्तन अनुभवले. कन्नमवारांच्या इंग्रजीला आणि व्यवहारात अभावानेच दिसणाऱ्या त्यांच्या नेटकेपणाला हसणाऱ्या तथाकथित मोठया माणसांना त्यांचा हा बिकट वाटेवरचा प्रवास कधी विचारात घ्यावासा वाटला नाही.
कन्नमवारांना राज्याचे मुख्यमंत्रीपद अपघाताने वा नशिबाने मिळाले नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद देणे ही महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाची तेव्हाची गरज होती ही बाबही त्याचमुळे कोणाला महत्त्वाची वाटली नाही. 1956 च्या अखेरीस देशात भाषावार प्रांत रचना झाली. त्यावेळी स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्यात 1957 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उमेदवारांनी मुंबईसह प. महाराष्ट्र आणि मराठवाडयात काँग्रेस उमेदवारांना अस्मान दाखविले तर इंदुलाल याज्ञिकांच्या नेतृत्वातील महागुजराथ जनता परिषदेने साऱ्या गुजराथेत त्या पक्षाला धूळ चारली. त्या स्थितीत मुंबईत काँग्रेसचे यशवंतराव सरकार टिकवायचे तर त्या पक्षाचे 54 आमदार निवडून देणाऱ्या विदर्भाला महाराष्ट्रात कायम ठेवणे ही त्या पक्षाची गरज होती. दादासाहेब कन्नमवार हे त्या आमदारांचे सर्वश्रेष्ठ नेते होते. ते वेगळया विदर्भाचे पुरस्कर्ते होते. फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार विदर्भाचे वेगळे राज्य झाले असते तर कन्नमवार हे त्याचे पहिले मुख्यमंत्रीच झाले असते. पुढे 1959 मध्ये नागपुरात काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अधिवेशन यशस्वीरित्या भरवून त्यांनी आपले ते स्थानमहात्म्य सिध्दही केले होते. विदर्भ राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडून कन्नमवारांनी एका निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यासारखे महाराष्ट्रात राहणे तेव्हा मान्य केले आणि त्या बळावर यशवंतरावांचे मुख्यमंत्रीपद शाबूत राहिले व टिकले. मात्र त्यासाठी कन्नमवारांचे मन वळवायला प्रत्यक्ष पं. जवाहरलाल नेहरूंना आपला शब्द खर्ची घालून त्यांची मनधरणी तेव्हा करावी लागली होती.
कन्नमवारांच्या वाटयाला आलेले उपमुख्यमंत्रीपद या घटनाक्रमातून त्यांच्याकडे आले ही गोष्ट पश्चिम महाराष्ट्रासकट विदर्भातल्या विचारवंतांनीही पुरेशा गांभीर्याने कधी नोंदवली नाही. उलट उपमुख्यमंत्रीपदासाठी कन्नमवारांनी विदर्भ राज्याची आपली मागणी सोडली असा गहजबच त्या काळात त्यांच्याविरुध्द केला गेला. पुढे यशवंतराव चव्हाण केंद्र सरकारात संरक्षण मंत्री पदावर गेल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद कन्नमवारांकडे येणे अतिशय स्वाभाविक व प्रस्थापित नियमाला अनुसरूनच होते. एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा आडगावचा दरिद्री माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर असा पोहोचला होता.
कन्नमवार मुख्यमंत्री होऊन चंद्रपुरात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी 10 हजारावर लोकांचा समुदाय तिथल्या विश्रामभवनासमोर उभा होता. पोलिसांची मानवंदना स्वीकारण्याआधी दादासाहेब त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे त्या समुदायात शिरले. त्यातल्या अनेकांशी त्यांची नावं घेऊन ते बराच काळपर्यंत एकेरीत बोलत राहिले. सावलीजवळच्या खेडयातून आलेला एक शिक्षक तेवढया गर्दीत मुख्यमंत्र्यांजवळ आपल्या जावयाची तक्रार करताना तेव्हा दिसला. आपला जावई मुलीला सासरी नेत नसल्याचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्या नाठाळ जावयाला दटावण्याची विनंती तो घरच्या माणसाशी बोलावे तशा आवाजात त्यांना करीत होता. पुढे दादासाहेबांच्या दौऱ्यात गेलेल्या पत्रकारांत मीही होतो. कन्नमवारांचे सावधपण हे की त्या जावयाच्या गावी जाताच त्यांनी अधिकाऱ्यांना धाडून त्याला बोलवून घेतले आणि 'बायकोला नेले नाहीस तर माझ्याशी गाठ आहे' अशी समज त्यांनी त्या जावयाला दिली. कन्नमवारांच्या येण्याचा मुहूर्त हा चंद्रपूर परिसरातल्या लोकांसाठी जत्रेचा मुहूर्त असे. 'दादासाहेबांना पाहायला चाललो' असे एकमेकांना सांगत शेकडोंच्या संख्येने लोक त्यांना नुसतेच पाहायला येत. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचे असे लोंढे आवरताना पोलिसांची पुरेवाट होत असे.
एकच एक मळकट सदरा अन् एकच एक काळपट धोतर नेसून काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात पडेल ते काम करणारे अन् प्रसंगी कार्यालयाबाहेर टाकलेल्या बाकडयावर थकून झोपी जाणारे दादासाहेब कन्नमवार आजही त्या परिसरातील वयोवृध्द माणसांच्या स्मरणात आहेत. त्याच काळात तेव्हाची वृत्तपत्रे घरोघर टाकणाऱ्या पोराचे काम करून त्यांनी गुजराण केली. काँग्रेस पक्ष आणि त्याचे सगळेच कार्यकर्ते त्या काळात कमी अधिक हलाखीचे जिणे जगणारे होते. कधीमधी त्यातल्याच एखाद्याला त्यांच्या घरातल्या दारिद्रयाची आठवण यायची अन् तो त्यांच्या घरात कधी पायली दोन पायली तांदूळ तर कधी ज्वारी नेऊन टाकायचा.
चंद्रपूरसह सगळया विदर्भातील काँग्रेस पक्षावर तेव्हाच्या प्रतिष्ठित धनसंपन्न आणि उच्चवर्णीय पुढाऱ्यांचा वरचष्मा होता. त्यांच्यात अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे व दादा धर्माधिकारी यांच्यासारख्या तपस्वी अन् विद्वान माणसांपासून बजाज व बियाणींपर्यंतच्या धनवंतांचा समावेश होता. त्या काळात कन्नमवारांनी समाजाच्या तळागाळातली साधी अन् सामान्य माणसे हाताशी धरली. त्यांच्या माध्यमातून बहुजन समाजातील वेगवेगळे वर्ग आपल्यासोबत घेतले. उच्चवर्णीय पुढाऱ्यांचे लक्ष दिल्ली अन् नागपूरकडे लागले असताना ग्रामीण भागातील उपेक्षित वर्गांना जवळ करणारा कन्नमवार नावाचा गरीब माणूस त्या वर्गांना स्वाभाविकपणेच अधिक विश्वासाचा वाटला.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात वाटयाला आलेल्या हालअपेष्टा कन्नमवारांच्याही वाटयाला आल्या. जवळजवळ प्रत्येकच आंदोलनात त्यांना तुरुंगाची वारी घडली. त्या काळातली त्यांची एक आठवण अजूनही जुनी माणसे मिस्किलपणे सांगतात. कन्नमवार चांगली भाषणे देत. त्यांच्या भाषणात ग्रामीण म्हणी अन् गावठी किस्से भरपूर असत. ते सगळे चपखलपणे व्याख्यानात आणून ते भाषण रंगवीत. पण आरंभीच्या काळात त्यांना आपल्या व्याख्यानातला उत्साह आवरता येत नसे. बोलताना अवसान चढले की ते श्रोत्यांच्या दिशेने पुढे सरकू लागत. लाऊडस्पिकरची चैन तेव्हाच्या काँग्रेसला परवडणारी नसल्यामुळे पुढे सरकणाऱ्या त्या जोशिल्या नेत्याला अडवायला तो अडसरही त्या काळात नसे. या प्रवासात खूपदा ते व्यासपीठाच्या पुढल्या टोकापर्यंत पोहोचत. मग त्यांना कोणीतरी धरून मागे आणत असे. कै. पं. बालगोविंदजी हे त्या काळात चंद्रपूरच्या काँग्रेसचे ज्येष्ठ व आदरणीय नेते होते. भाषण देताना पुढे सरकणाऱ्या कन्नमवारांना एका जागी खिळवून ठेवण्यासाठी त्यांच्या शर्टाच्या मागल्या बाजूला दोरी बांधण्याचा अफलातून आदेशच तेव्हा पंडितजींनी काढला. ऐन भाषणात त्यांचे पाऊल पुढे पडले की कोणीतरी त्यांच्या शर्टाला बांधलेली दोरी मागून घट्ट धरून ठेवायचा. मात्र कोणताही दोर कन्नमवारांना थांबवू किंवा अडवू शकला नाही. उच्चभ्रू समाजाने कितीही नावे ठेवली तरी सामान्य माणूस नेहमी त्यांच्यासोबत राहिला अन् ते सामान्यांसोबत राहिले. याच प्रक्रियेतून त्यांच्या लोकनेतृत्वाचा उदय झाला.
विदर्भाच्या राजकारणात कन्नमवारांचे वर्चस्व जसजसे वाढत अन् विस्तारत गेले तसतसा काँग्रेसमधील एक एक प्रस्थापित पुढारी पक्षीय राजकारणाच्या बाहेर पडून 'विधायक कार्य' करू लागला. आचार्य विनोबा भाव्यांचा पवनार आश्रम विदर्भातच असल्यामुळे त्यातल्या अनेकांना तो जवळ करावासा वाटला. कन्नमवारांकडून पराभूत झालेली किती माणसे त्या काळात अशा विधायक चळवळीकडे वळली त्याचा हिशोब कधीतरी मांडला जावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात कधीकाळी जोरात असलेली ब्राह्मणेतर चळवळ पूर्व विदर्भात फारशी जोरकस कधी नव्हतीच. असलीच तर तिचे थोडेफार अस्तित्व राजकारणापुरते मर्यादित होते अन् दादासाहेब कन्नमवार हे त्या क्षीण प्रवाहाचे प्रभावी नेते होते.
1941-42 या काळात पुनमचंदजी राका यांच्यानंतर नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीचे ते अध्यक्ष झाले. नंतरच्या काळात काँग्रेसच्या तिकिटावर ते देशाच्या घटना समितीवर निवडले गेले. 1952 साली झालेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत मध्यप्रांत व वऱ्हाडच्या विधीमंडळात निवडून जाऊन ते त्या राज्याचे आरोग्यमंत्री झाले.
कोणतीही शैक्षणिक पदवी गाठीशी नसणारा माणूस आरोग्य खात्याचा मंत्री झाला तेव्हा त्याची राज्याच्या उच्चभ्रूंकडून भरपूर टिंगलटवाळी होणे अपेक्षितच होते. कन्नमवारांचीही अशी पुरेशी टवाळी झाली. मेडिकल कॉलेजमधील एका रुग्णावरील उपचाराचे कागद हाती घेऊन कन्नमवारांनी त्याला 'पोस्टमार्टम' अहवाल म्हटले असा एक सरदारजीछाप विनोद त्यांच्या नावावर त्या काळात खपविला गेला. स्वत:ला प्रतिष्ठित म्हणविणाऱ्या अनेक तथाकथित बुध्दिवंतांनी नंतरच्या काळात कन्नमवारांच्या नावावर अशा सवंग विनोदाच्या अनेक कहाण्या पिकविल्या. कन्नमवारांचा वेष आणि वागणे या दोहोतही एक अस्सल ग्रामीणपण असल्यामुळे अनेक पदवीधारक विद्वानांना त्या कहाण्या खऱ्याही वाटल्या. कन्नमवारांना सफाईदार अन् अस्खलित नसले तरी चांगले इंग्रजी येत होते. प्रशासकांच्या व अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रसंगी ते इंग्रजीतून बोलत. मुंबईत भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन करताना त्यांनी तब्बल 20 मिनिटे इंग्रजीत भाषण केले. त्या भाषणात जराशीही चूक झाल्याचे कोणाला आढळले नाही या वास्तवाकडे त्यांच्या टवाळखोरांना लक्ष द्यावेसे कधी वाटले नाही. 1959 साली मी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालो. माझे वडील स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व जिल्ह्याच्या काँग्रेस संघटनेतील एक आघाडीचे कार्यकर्ते होते. कन्नमवारजींशी त्यांचा संबंध परस्परांशी एकेरीत बोलण्याइतका निकटचा होता. दादासाहेब माझ्या वडिलांना 'जन्या' (जनार्दन) म्हणत अन् माझे वडील त्यांना त्यांच्या 'मारोती' या नावाने हाक मारत. त्या काळातील आमच्या हलाखीच्या स्थितीची पूर्ण जाणीव असलेल्या दादासाहेबांनी मला माझ्या परीक्षेतील यशाचे अभिनंदन करणारे 12 ओळींचे पत्र लिहिले. हे पत्र त्यांच्या हस्ताक्षरात अन् अस्सल इंग्रजीत आहे. ते मी अद्याप जपून ठेवले आहे. कन्नमवारांनी अनेक मंत्रीपदे भुषविली. वाटयाला आलेले खाते कोणतेही असो त्यातील प्रशासनाधिकाऱ्यांवर त्यांचा कमालीचा वचक होता ही गोष्ट प्रशासनातला कोणताही जुना अधिकारी आज सांगू शकेल.
1953 साली पोट्टी श्रीरामलू यांच्या नेतृत्वात झालेली आंध्रप्रदेशाच्या निर्मितीची चळवळीचे पडसाद पश्चिम महाराष्ट्रात उमटले. पश्चिम महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे राहिले. याच काळात विदर्भात व विशेषत: पूर्व विदर्भात वेगळया विदर्भाची चळवळ संघटित होऊ लागली. दादासाहेब कन्नमवार हे मनाने पुरते विदर्भवादी होते. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगासमोर बोलताना कन्नमवारांनी वेगळया विदर्भाच्या मागणीचा जाहीर उच्चार केला. वेगळया विदर्भासाठी स्वत:सकट आपल्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या आमदारांचा विधीमंडळाचा राजीनामा द्यायला आपण तयार असल्याचे कन्नमवारांनी त्यावेळी सांगितले. राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावर प्रांत रचनेबाबत केंद्र सरकारला केलेल्या शिफारशीत विदर्भाच्या वेगळया राज्याची शिफारस पुढे नोंदवली, हे कन्नमवारजींच्या भूमिकेचेच यश होते.
मात्र कन्नमवारांच्या विदर्भवादाला वऱ्हाडातील काँग्रेसचे पुढारी त्याही काळात अनुकूल नव्हते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तर त्या राज्यावर मराठा जातीचे वर्चस्व असेल ही गोष्ट वऱ्हाड काँग्रेसमधील मराठा पुढाऱ्यांना तेव्हाही दिसत होती. विदर्भाचे वेगळे राज्य झाले तर त्याचे नेते मराठा नसलेले कन्नमवार असतील हेही त्या पुढाऱ्यांना कळणारे होते. स्वाभाविकच वऱ्हाडच्या प्रदेश काँग्रेस कमेटीमध्ये नागपूर काँग्रेस कमेटीएवढा विदर्भाबाबतचा उत्साह नव्हता. तशाही स्थितीत काँग्रेसच्या आमदारांना विदर्भाच्या प्रश्नावर एका रांगेत त्यांच्या राजीनाम्यानिशी उभे करणे कन्नमवारांना जमले, ही गोष्ट त्यांचा राजकारणावरील दबदबा स्पष्ट करायला पुरेशी ठरावी.
कन्नमवारजींचे विदर्भाच्या राजकारणावरील वर्चस्व निर्विवादपणे 1959 साली नागपुरात भरलेल्या अ. भा. काँग्रेस महासमितीच्या अतिप्रचंड अधिवेशनानेही सिध्द केले. कन्नमवारजींच्या पत्नी गोपिकाबाई तेव्हा नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष होत्या. त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. या अधिवेशनाचे यजमानपद त्यामुळे स्वाभाविकपणेच कन्नमवारजींकडे होते. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत ढेबरभाईंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाची भव्यता पाहून देशाच्या वेगवेगळया भागातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी कन्नमवारांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.
या अधिवेशनाच्या काळात झालेली नागपूर लोकसभेची पोटनिवडणूकही फार गाजली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या ऐन धडाक्याच्या त्या काळात समितीने आपले उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांना उभे केले. ते कन्नमवारांच्याच गावचे म्हणजे चंद्रपूरचे होते. कॉ. डांगे, अत्रे, एसेम ही सगळी संयुक्त महाराष्ट्राची फर्डी माणसे त्यांच्या प्रचारासाठी नागपुरात तळ मांडून बसली होती. काँग्रेसने आपली उमेदवारी बापूजी अण्यांसारख्या तपस्वी विदर्भवाद्याला दिली होती. साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेली ही निवडणूक बापूजींनी 50 हजारांच्या मताधिक्याने जिंकली. कन्नमवारांच्या विदर्भावरील वर्चस्वाची चुणूकही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांना त्यामुळे येऊन चुकली. या नेत्यांचा कन्नमवारांवरील रोष नंतर अखेरपर्यंत कायम राहिला हेच पुढच्या घटनांनी स्पष्ट केले.
कन्नमवारांकडे पदवी नसली तरी प्रशासन कौशल्य होते. खेडयातून आलेल्या माणसाजवळ आढळणारे सहज साधे सावधपण आणि समयसूचकता त्यांच्यात होती. माणूस जोखण्याचे राजकीय कसब होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलण्यात अन् त्याला आपलेसे करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. सांगली-साताऱ्याकडील अनेक कार्यकर्त्यांनाही त्यांचे हे सहजसाधे माणूसपण भावले होते. 'मुख्यमंत्री असून ते आमच्याशी घरच्या माणसाशी बोलावे तसे बोलले' अशी त्यांची आठवण काढणारे पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाडयातले अनेकजण दादासाहेबांच्या मृत्यूनंतर मला भेटले अन् त्यांच्यातील अनेकांनी तशा आठवणी लिहिल्या.
कन्नमवार मुख्यमंत्रीपदावर असतानाची गोष्ट.
सरकारी कामासाठी त्यांच्या वारंवारच्या बोलावण्याला कंटाळलेले एक वरिष्ठ अधिकारी एक दिवस सगळा धीर गोळा करून मुख्यमंत्र्यांना म्हणाले 'दादासाहेब, आम्हा लोकांना एक कौटुंबिक जीवन आहे. सायंकाळची वेळ आम्हाला त्यात घालवायची असते. तुम्ही एकतर सकाळी नाहीतर सायंकाळी आम्हाला बोलवीत चला' दादासाहेब म्हणाले 'ठीक आहे'.
दुसरे दिवशी सकाळी ते स्वत:च त्या सचिवांच्या घरी पोहोचले. त्यांना तसे आलेले पाहून ते सचिव पुरेसे सर्द झाले. आरंभीचा स्वागताचा उपचार आटोपल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, 'एक दोन फायलींवरचे निर्णय राहिले होते. ते आज दुपारपूर्वी घेणे जरूरीचे होते, तुम्हाला बोलवायचे जीवावर आले म्हणून मीच तुमच्याकडे आलो.' सचिव जे समजायचे ते समजले अन् माफी मागून मोकळे झाले.
सिंहगडावर जाणारा रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्याचे आदेश बांधकाम मंत्री असताना दादासाहेबांनी तिथल्या अधिकाऱ्यांना जागच्या जागी दिले. तसे करणे यंदाच्या आर्थिक तरतुदीत कसे बसणार नाही ही गोष्ट ते अधिकारी त्यांना समजावू लागले तेव्हा कन्नमवार म्हणाले, 'तरतुदी काम करण्यासाठी असतात. ते न करण्यासाठी नसतात. तुमच्याने ते होत नसेल तर तेवढेच फक्त सांगा.'
मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांचा एक मोठा संप कन्नमवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत झाला. त्या संपाच्या वाटाघाटीसाठी कामगार नेत्यांचे एक शिष्टमंडळ जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाले. मुंबईच्या वृत्तपत्रांसह अनेक नामवंतांनी कन्नमवारांची जी प्रतिमा रंगविली तीच बहुदा या नेत्यांच्याही मनात असावी. वाटाघाटीला सुरुवात करतानाच त्या नेत्यांपैकी एकजण म्हणाला, 'आमच्या मागण्यांपैकी बहुतेक सगळया आधीच्या मुख्यमंत्र्यांनी, यशवंतरावजींनी तत्त्वत: मान्य केल्याच आहेत.' त्या पुढाऱ्याला तेथेच थांबवत दादासाहेब म्हणाले, 'आता यशवंतरावजी मुख्यमंत्री नाहीत. मी मुख्यमंत्री आहे.' पुढारी चपापले अन् साऱ्या गोष्टी नव्याने चर्चेला आल्या. त्याच चर्चेच्या दरम्यान त्या पुढाऱ्याने एकवार पुन्हा धीर एकवटून दादासाहेबांना म्हटले 'आमच्या विनंतीचा मान राखायला आपण एकवार यशवंतरावजींशी बोलून का घेत नाहीत?'
त्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांना तात्काळ फोन जोडून दिला गेला. अडचण एवढीच झाली की कधीही न बिघडणाऱ्या त्या फोनवर मुख्यमंत्र्यांचे बोलणे संरक्षण मंत्र्यांना स्पष्ट ऐकू गेले. संरक्षणमंत्र्यांचे बोलणे मात्र कन्नमवारांना अजिबात ऐकू आले नाही. हताश चेहरा करून दादासाहेबांनी यशवंतरावांना अखेर म्हटले 'काही एक ऐकू येत नाही. तुमचे म्हणणे मला लिहूनच कळवा.' अन् त्यांनी फोन ठेवला. कन्नमवारांचा बेरकीपणा यशवंतरावांसकट फर्नांडिसांनाही समजला तेव्हा त्या वाटाघाटी रीतसर सुरू झाल्या.
1967 साली भरलेल्या आनंदवनाच्या मित्रमेळाव्याला आलेल्या फर्नांडिसांनी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्याविषयीचे असे अनेक किस्से तेथे जमलेल्यांना ऐकविले. त्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत स.का. पाटील यांना पराभूत करून निवडून आलेल्या फर्नांडिसांभोवती एक तेजोवलय तेव्हा होते. त्यामुळे त्यांच्या गोष्टी ऐकायला त्यांच्याभोवती अनेकांनी गर्दी केली होती.
मुंबईतील सफाई कामगारांच्या संपाच्या काळात मुख्यमंत्री स्वत:च रस्ता झाडणार असल्याची साऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी घोषणा कन्नमवारांनी केली होती. लागलीच मुंबईच्या वृत्तपत्रांनी झाडुवाला मुख्यमंत्री म्हणून त्यांची टर उडवायला सुरुवात केली. कन्नमवारांचे हे प्रसिध्दीचे चाळे आहेत असेही त्यांच्या टीकाकारांनी सांगून टाकले. हातात झाडू घेतलेले कन्नमवार दाखविणारी टवाळखोर व्यंगचित्रेही तेव्हा प्रकाशित झाली.
प्रत्यक्षात ठरलेल्या दिवशी अन् नियोजित वेळी मुख्यमंत्री दादर चौकात आले आणि त्यांनी शांतपणे रस्ता झाडायला सुरुवात केली. स्वातंत्र्याच्या लढयात शिपाई म्हणून काम केलेल्या आणि सारे आयुष्य दारिद्रयात काढलेल्या कन्नमवारांना त्या कामाची खंत वाटण्याचे काही कारणही नव्हते. मुख्यमंत्री रस्ता झाडत असल्याचे पाहून दादर परिसरातले काँग्रेसचे कार्यकर्तेही हातात झाडू घेऊन रस्त्यावर आले. मुंबईच्या नागरिकांना हा अनुभव नवा होता. राज्याचे मुख्यमंत्री रस्ते सफाईचे काम प्रतिक म्हणून एकच दिवस करतील ही सर्व संबंधितांची अटकळ कन्नमवारांनी खोटी ठरविली. दरदिवशी मुंबईच्या एका नव्या वस्तीत राज्याचा मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांसह रस्ते झाडत असल्याचे दृश्य मुंबईकरांना तेव्हा पाहायला मिळाले. परिणाम असा झाला की या घटनेने संकोचलेले सफाई कामगारच फर्नांडिसांकडे जाऊन संप मागे घेण्याची विनंती त्यांना करू लागले. रस्ते सफाईची आरंभी टर उडविणाऱ्या वृत्तपत्रांनी त्या साध्या आणि प्रतिकात्मक कामगिरीच्या या परिणामाची दखल घेण्याचे मात्र नेमके टाळले.
ग्रामीण भागातून आलेल्या माणसांत एक उपजत शहाणपण असते. तशा नेत्यांमध्ये मी ते अनेकदा पाहिले आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीपदावर असताना एकदा भामरागडला आले. त्या गावच्या आदिवासींनी भामरागड ते लाहेरी हा रस्ता रुंद व चांगला करून देण्याची विनंती त्यांना केली. मात्र तेथील झाडे तोडता येणार नाहीत असा तेव्हाच्या वनसंवर्धन कायद्याचा निर्बंध होता. गावकऱ्यांची विनंती मान्य करायची तर शेकडो झाडे तोडावी लागतील आणि तसे करणे नियमात कसे बसत नाही हे तेव्हा वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. जरा वेळ दोन्ही बाजूंचे ऐकून घेऊन वसंतदादा अधिकाऱ्यांकडे वळून म्हणाले, 'झाडे तोडावी लागतील म्हणता ना. पण मला तर झाडे कुठे दिसतच नाहीत.' अधिकारी समजायचे ते समजले आणि भामरागड-लाहेरी हा रस्ता काही महिन्यांतच बांधून तयार झाला. कन्नमवार असेच होते. त्यांना वसंतदादांसारखा विकासाचा सरळ मार्गच दिसत होता.
कन्नमवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतला असा एक प्रसंग मी स्वत: अनुभवला आहे. गडचिरोलीहून 13-14 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेडयातील शाळेच्या इमारतीचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऐन पावसाळयात व्हायचे होते. त्यासाठी दादासाहेब आदल्या रात्रीच गडचिरोलीत डेरेदाखल झाले होते. त्यांच्यासोबत आलेल्या पत्रकारांच्या चमूत मीही होतो. सारी रात्र पडलेल्या पावसाने त्या मागासलेल्या क्षेत्रातील अगोदरच्याच कच्च्या रस्त्यांचा सकाळपर्यंत पार चिखल करून टाकला होता. त्यामुळे शाळेच्या जागी जाणे कसे अवघड आहे हे तेथील अधिकारी सकाळी त्यांना समजावून सांगू लागले. त्यांचा तो सल्ला अव्हेरताना दादासाहेब शांतपणे म्हणाले, 'अहो त्या गावात हजारो माणसे आपल्या भेटीसाठी आली असणार. तुमच्यापैकी ज्यांना चिखलातून येणे जमणार नसेल ते येथे थांबा. मला अशा प्रवासाची सवय आहे.'
पाहता पाहता हातात चपला घेऊन मुख्यमंत्री चिखलाची वाट तुडवू लागले. तब्बल 12 कि.मी. अंतर पायी चालत जाऊन ते तेथे जमलेल्या हजारो लोकांना भेटले. त्यांच्यामागे पळत जाणाऱ्या अधिकाऱ्यांची तारांबळ तेथे जमलेल्या अनेकांची करमणूक करणारी ठरली. कन्नमवार आयुष्यभर सामान्य माणसात राहिले. आपल्यावरचा सामान्यपणाचा संस्कार त्यांनी जाणीवपूर्वक सांभाळला. वागण्या बोलण्यातल्या साधेपणामुळे ते उच्चभ्रूंना त्यांच्या बरोबरीचे वाटले नसले तरी सामान्यांना मात्र ते कधी दूरचे वाटले नाही. त्यांचेही आग्रह असत आणि त्या आग्रहासाठी प्रसंगी ते कठोर भूमिका घेत. पण तुटेपर्यंत ताणण्याचा दुराग्रह त्यांनी कधी धरला नाही.
या साऱ्या काळात अत्रे आणि त्यांचा मराठा यांनी केलेले वार ते झेलतच राहिले. अत्र्यांच्या हल्ल्यापुढे भलेभले गारद झाले, भ्याले, त्यांना उत्तर देणे शक्य असूनही तसे करणे कोणाला फारसे जमले नाही. कन्नमवारांनी ते धाडस केले. मुळातच तो लढवय्या माणूस होता. अत्र्यांचे आव्हान स्वीकारून त्या जंगी माणसाला स्वप्नातही अनुभवावी लागली नसेल ती तुरूंगाची हवाच एक आठवडा कन्नमवारांनी त्याला खायला लावली. अत्र्यांची मुजोरगिरी त्यामुळे कमी झाली नसली तरी आपण ज्याच्याशी पंगा घेत आहोत त्याचे बळही त्या घटनेने त्यांच्या लक्षात आणून दिले... नंतरच्या काळात विदर्भाच्या चळवळीचे एक नेते त्र्यं.गो. देशमुख यांचे आपल्या कार्यालयात स्वागत करताना आचार्यांनी कन्नमवारांच्या त्या साहसाची कबुलीच त्यांच्याजवळ देऊन टाकली.
1962 साली नगरला झालेल्या अ.भा. पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मराठवाडयाचे संपादक अनंत भालेराव तर उद्धाटक मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार होते. अनंतरावांच्या छापील भाषणात सरकारच्या वृत्तपत्रविषयक धोरणावर कठोर टीका करणारे काही परिच्छेद होते. ते परिच्छेद तसेच वाचले जाणार असतील तर मला तेथे येता येणार नाही असा निरोप मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी परिषदेच्या आयोजकांना पाठविला. अनंतरावांनीही आपल्या भाषण स्वातंत्र्याचा आग्रह धरून आपण तो परिच्छेद वाचणारच असे स्पष्ट केले. परिणामी उद्धाटनाची वेळ टळली तरी परिषदेचे व्यासपीठ रिकामेच राहिले. जरा वेळाने स्वत: अनंतरावांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना ते स्वातंत्र्यसंग्राम सैनिक असल्याची आठवण करून दिली. खुद्द अनंतराव हैद्राबादच्या मुक्ती लढयातील आघाडीचे सैनिक होते. एका स्वातंत्र्य सैनिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या स्वातंत्र्याचा संकोच करणे चांगले नाही असे अनंतरावांनी म्हणताच कन्नमवार विरघळले आणि लगोलग समारंभाच्या ठिकाणी आले. पुढल्या कार्यक्रमात अनंतरावांनी ते परिच्छेद वाचले तेव्हा कन्नमवारांनी आपले डोळे मिटून घेतले एवढेच तेथे जमलेल्या पत्रकारांसोबत मी पाहिले.
1962 च्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सगळे विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात प्रथमच संघटित झाले. त्या निवडणुकीत कन्नमवारांना जेमतेम सहाशे मतांनी विजय मिळवता आला. त्यांच्या विजयाची वार्ता समजली तेव्हा त्यांचे खंदे विरोधक असलेले अहेरीचे राजे विश्वेश्वरराव म्हणाले 'माझ्या सर्वात चांगल्या शत्रूचे मी मनापासून अभिनंदन करतो.' राजकारणात शत्रुत्व करणाऱ्या कन्नमवारांनी आपल्या विरोधकांशी असे जिव्हाळयाचे संबंध जपले होते हे सांगणारी ही घटना आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक हजरजबाबी खटयाळपणाही होता. मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाल्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हा पत्रकार संघाने त्यांचा एक छोटेखानी सत्कार केला. शांताराम पोटदुखे हे त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि मी सरचिटणीस होतो. त्यांच्या स्वागतपर भाषणाची सुरुवात करताना 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री' असे न म्हणता चुकून मी महाराष्ट्राचे मुख्याध्यापक असे म्हणालो. त्यावर दादासाहेब जोरात ओरडून म्हणाले, 'अजूनही शाळेतच आहेस का रे?'
विदर्भातल्या माझ्यासारख्या असंख्य माणसांनी त्यांची अशी असंख्य साधी रूपे डोळयात आणि मनात साठवली आहेत. वंचनेपासून प्रतिष्ठेपर्यंतचा आणि सडकेपासून सत्तापदापर्यंतचा त्यांचा प्रवास आमच्या परिचयाचा आहे. सत्ताकारणात अपरिहार्यपणे वाटयाला येणारे सन्मान आणि मनस्ताप हे दोन्ही त्यांनी भरपूर अनुभवले. पण एवढया साऱ्या काळात त्यांचे माणूसपण आणि साधेपण कधी हरवले नाही. अपयशांनी खचलेले कन्नमवार कधी कोणी पाहिले नाहीत अन् यशाने त्यांना हेकेखोर बनविल्याचेही कधी कोणाला दिसले नाही. एवढया साध्या, सामान्य आणि गरीब माणसाचे मुंबईच्या वृत्तपत्रांनी केलेले विकृतीकरण त्याचमुळे विदर्भाला कधी समजू शकले नाही.
बापाचा वारसा नाही, जातीचं पाठबळ नाही, पैशाचा आधार नाही आणि शिक्षण वा पदवीसारख्या लौकिकावर मदार नाही. कन्नमवार असे वाढले आणि तशा गोष्टींच्या कुबडया घेऊन राजकारणाची वाट धरणाऱ्या साऱ्यांना त्यांनी मागे टाकले. आपल्या स्पर्धेत असलेल्या प्रत्येकाच्या गळयात त्यांनी पराजयाचा गंडाही असा बांधला की त्या पराभूतांनाही तो त्यांचा सन्मानच वाटावा. त्यांच्या राजकारणामुळे त्या क्षेत्रातून हद्दपार व्हावे लागलेल्या अनेक थोरामोठयांनी पुढे 'कन्नमवार आपले स्नेही होते' एवढीच एक गोष्ट नोंदवून त्यांच्या मोठेपणाएवढेच स्वतःच्या पराजयावर पांघरूण घातलेले दिसले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या प्रत्येकच पुढाऱ्याने आपले राजकीय वारसदार जन्माला घातले. पोटची मुले नसतील तर मानसपुत्र पुढे आणले. मुख्यमंत्री म्हणून पार अपयशी झालेल्या इसमांनीही तेवढा एक पराक्रम आपल्या नावावर नोंदविलेला दिसला. या साऱ्यांना अपवाद ठरलेला व त्यामुळे मराठी राजकारणातली घराणेशाही अधोरेखित करणारा एकमेव नेता आहे, मा.सां. कन्नमवार. त्याला अभावाचा वारसा होता आणि त्याने निर्माण केलेली परंपराही त्यागाचीच होती.
...........................................
कन्नमवारांचा जन्म 10 एप्रिल 1899 या दिवशी झाला. 1999 मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीची बैठक तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात भरली होती.
तीत बोलताना विदर्भातील एका ज्येष्ठ पत्रकाराने सह्याद्री या अतिथीगृहाला कन्नमवारांचे नाव देण्याची सूचना केली. कन्नमवारांचा मृत्यू त्यात झाला म्हणून त्याला ती करावीशी वाटली. ती ऐकताच मुख्यमंत्र्यांची झालेली अडचण त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. मग 'ही सूचना मान्य करण्यापेक्षा पंत वेगळा विदर्भ देणे पसंत करतील' असे म्हणून मीच मुख्यमंत्र्यांची त्या पेचातून सुटका केली होती.
कन्नमवारांच्या जन्मशताब्दीचा सोहळा प्रत्यक्षात कधी झाला नाही. मुंबईत नाही, नागपुरात नाही आणि चंद्रपूर या त्यांच्या गावातही नाही. जन्मशताब्दीच्या वर्षातही कन्नमवार ज्यांना दूरचे वाटले त्यांनी त्यांच्या हयातीत त्यांची उपेक्षा केली याची त्याचमुळे आता फारशी खंत करण्याचे कारण नाही.

No comments:

Post a Comment