Pages

Saturday, June 26, 2010

आपले विचार विश्व

'तत्त्वज्ञ माणसांनीच इतिहास लिहिला पाहिजे. आजवर लिहिला गेलेला इतिहास युध्दांच्या, म्हणजे सामुहिक गुन्हेगारीच्या नोंदींनी भरला आहे. युध्द आणि क्रांती म्हणजे जीवन नव्हे. जीवनाचे खरे प्रतिबिंब संस्कृतीत पडत असते. त्यामुळे खरा इतिहास हा संस्कृती आणि मानवी मन यांच्या उन्नयनाचाच असावा लागेल' इतिहासाच्या तत्त्वज्ञानाची पहिली रुपरेषा आखणाऱ्या व्हॉल्टेअरचे हे म्हणणे आहे. व्हॉल्टेअर आणि रुसो जन्माला आले नसते तर फ्रान्सची राज्यक्रांती झाली नसती हा जगाने मान्य केलेला निष्कर्ष ध्यानात घेतला की त्याच्या या उद्गारांची थोरवी लक्षात येते. या वचनाची आठवण व्हावी असे एक विलक्षण ताकदीचे, अल्पाक्षररमणीय आणि तरीही जगभरच्या तत्त्वचिंतनाचा पट वाचकांच्या मनःचक्षुपुढे समर्थपणे उभे करणारे 'आपले विचार विश्व' हे चारशे पृष्ठांचे ग्रंथवजा पुस्तक डॉ. के. रं. शिरवाडकर यांनी मराठी माणसांच्या स्वाधीन केले आहे. सारी प्राणीसृष्टी जलोद्भव असल्याचे सांगणाऱ्या थेल्स या आद्य ग्रीक तत्त्वश्रेष्ठापासून ज्वालामुखीच्या विवरात उडी घेऊन जीवनयात्रा संपविणाऱ्या ऍनाक्सिमॅँडरपर्यंत आणि जनतेने शिक्षा म्हणून दिलेले हेमलॉक हे विष पिऊन बळी गेलेल्या सॉक्रेटिसपासून जनतेच्या छळाला कंटाळून तेच विष पिऊन आत्महत्या करणाऱ्या ऍरिस्टॉटल या महाविद्वानापर्यंत सगळया ग्रीक तत्त्वपरंपरेचा आढावा या ग्रंथात आहे. वेदोपनिषदांपासून बुध्द-महावीरापर्यंत आणि आद्य शंकराचार्यांपासून रामानुज-मध्व आणि निंबार्कापर्यंत सगळया भारतीय तत्त्वपरंपरांची ओळखही त्यात आहे. त्यातल्या प्रत्येकीचे वेगळेपण अतिशय नेमकेपणे तिच्या उंची आणि मर्यादांसह शिरवाडकरांनी आपल्या ग्रंथात नोंदविले आहे. निसर्गाच्या आज्ञेप्रमाणे जगणे श्रेयस्कर असे म्हणणाऱ्या ताओपासून राजधर्माचे समर्थन करणाऱ्या लाओ-त्सेपर्यंतची चीनी तत्त्वपरंपराही तीत समाविष्ट आहे. तत्त्वज्ञानाचे अध्ययन करणाऱ्या अनेकांना या ज्ञानाची फार मोठी परंपरा एकेकाळी अरब जगात होती याचे भान बहुदा नसते. अल् किंदी, इब्न हय्यान, हय्यात, अल् बिरूनी, अल् क्वारिझामी अशी ही परंपरा मोठी तर आहेच शिवाय त्या परंपरेतील ज्ञानवंतांनी ग्रीकांची तत्त्वपरंपरा जिवंत ठेवण्याचे व ती पुढल्या काळात युरोपातील तत्त्वचिंतकांच्या हाती सोपविण्याचे अद्भूत कार्यही केले आहे. भारतीय ज्ञानविज्ञानाच्या परंपरेतील अनेक ग्रंथ अरबी भाषेत भाषांतरित करून ते लुप्त होणार नाहीत याची काळजीही त्यातल्या अनेकांनी घेतली आहे. तत्त्वज्ञानाचा विकास आणि विस्तार जगभरच्या विचारवंतांमधील परस्पर सहयोगाने झाला असला तरी त्याविषयीची कृतज्ञता त्याच्या अभ्यासकांतही अभावानेच आढळणारी आहे. डॉ. शिरवाडकर यांनी या सहयोगाची ओळख कमालीच्या सहृदयतेने करून दिली आहे.
आरंभी विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन वेगळया ज्ञानशाखा नव्हत्या. सुरूवातीचे सगळे ग्रीक तत्त्वज्ञ विज्ञानाचेच उपासक होते. पायथागोरस गणिती होता. भारतातही कणादापासून चरक आणि आर्यभट्टापर्यंतच्या परंपरा वैज्ञानिकांच्या, गणितज्ज्ञांच्या आणि आरोग्यविषयक चिकित्सकांच्याच आहेत. ग्रीसमध्ये या परंपरेचा शेवट अलेक्झांडरच्या आक्रमणकारी साम्राज्यवादाने व पुढे ख्रिश्चानिटीच्या धर्मश्रध्देने केला. भारतात या परंपरेविरुध्द सगळे धर्म तत्कालीन सम्राटांची साथ घेऊन उभे राहिले. त्यात जडवाद संपला आणि विज्ञानाची वाटचालही संपली. मुळात हे श्रध्दा आणि चिकित्सा यातले भांडण आहे. 'तुम्ही फक्त श्रध्दा ठेवा', 'इमान आणा', 'सारे ज्ञान धर्मग्रंथात आहे, त्यासाठी तुम्ही स्वतंत्र विचार करण्याची गरज नाही' ही धर्मांची मांडणी तर 'साऱ्या तत्त्वचिंतनाचा जन्म संशयातून होतो' असे ज्ञानाचे सांगणे. बुध्दी आणि मन, विचार आणि श्रध्दा व प्रश्न विचारण्याची क्षमता आणि शरणागतबुध्दी यांच्यातील हा संघर्ष आहे. सगळे मध्ययुग हे धर्मश्रध्दांचे आणि त्यांनी ज्ञानविज्ञानाच्या परंपरा मोडीत काढणारे युग आहे. युरोपातील संशोधकांचा चर्चने केलेला छळ, अरब विचारवंतांची इस्लामने मोडीत काढलेली चिंतनपरंपरा आणि जडवादाला चंगळवाद ठरवून बदनाम करण्याचा भारतीय परंपरांचा आवेश या सगळया धर्मश्रध्देच्या वेदीवर ज्ञानविज्ञानांच्या परंपरा बळी जाण्याच्या कहाण्या आहेत. शिरवाडकरांनी आपल्या ग्रंथांत पाश्चात्त्य तत्त्वचिंतक आणि वैज्ञानिक यांच्या धर्माने केलेल्या कोंडीचा जेवढा सढळ उल्लेख केला तेवढया ठळकपणे भारतातील त्या परंपरेच्या अशा गळचेपीची नोंद केली नाही. मात्र ही परंपरा भारतात पुढे सरकलीच नाही ही गोष्ट उत्तरकाळात तिच्या न येणाऱ्या उल्लेखातून स्पष्ट होणारी आहे. शिरवाडकरांच्या ग्रंथात फ्रान्सिस बेकनपासून देकार्त, कान्ट, हेगेल, हॉब्ज या उत्तरकालीन तत्त्वज्ञांच्या विचारांचा परामर्श आहे. व्हॉल्टेअर, रुसो, नित्शे, फ्राईड आणि मार्क्स या साऱ्यांची दखल आहे. अगदी अलिकडच्या सार्त्र, कॅम्यू, फ्रॉम आणि चॉम्स्की यांचाही त्यात समावेश आहे. बर्ट्रांड रसेलचा परिचय करून आईन्स्टाईनने केलेल्या ज्ञानविज्ञानाविषयीच्या विनम्र मांडणीने या ग्रंथाचा त्यांनी शेवट केला आहे. त्यात आपल्या चिंतन परंपरेत तेराव्या शतकानंतर झालेल्या संत परंपरेचा परामर्श आहे. महानुभाव, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदासापर्यंत येऊन 19 आणि 20 व्या शतकात झालेल्या राजा राममोहन रॉय, ज्योतिबा, आगरकर, गोखले, रानडे, टिळक, गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांचे सारही त्यात समाविष्ट आहे. या साऱ्या विभूतीमत्त्वांच्या विचारांची संक्षिप्त ओळख करून देताना त्यांची त्यांच्या जन्मकाळाशी व समाजाने घेतलेल्या वळणांशी सांगड घालून दाखविण्याचे अवघड कामही शिरवाडकरांनी अतिशय सहजपणे केले आहे. एवढया मोठया विषयाची मांडणी चारशे पृष्ठांच्या ग्रंथात अतिशय प्रवाही व सोप्या भाषेत करून दाखवणे ही किमया आहे. सारा तत्त्वविचार ग्रहण करून व पचवून घेतल्याखेरीज त्याची अशी उकल करता येणे अशक्य आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचत असताना त्यातल्या तत्त्वज्ञानी पुरुषांसोबत उभे राहून त्यांचा विचार समजावून सांगणारे प्रो. शिरवाडकरही वाचकांना सतत दिसणारे आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ या क्रांतीकारी संन्याशाने नांदेड येथे सुरू केलेल्या पिपल्स कॉलेजचे दीर्घकाळ प्राचार्य राहिलेल्या शिरवाडकरांनी नंतर औरंगाबादच्या डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व पुढे पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. कुसुमाग्रजांचे धाकटे बंधू असलेले 'के.रं.' हे इंग्रजी वाङमयाचे आचार्य असून त्याही विषयावरील त्यांचे मौलिक लेखन उपलब्ध आहे. 85 वर्षे वयाच्या या ज्ञानवंताने आपल्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचे सारे सार या ग्रंथात शब्दबध्द केले आहे. ते तटस्थ विचारवंत आहेत. विज्ञाननिष्ठ असले आणि धर्मश्रध्दांची चिकित्सा करीत असले तरी तीत उपहासाचा लवलेश नाही. ही चिकित्सा त्यांनी कमालीच्या ममत्वाने केली आहे. त्यांच्या सर्व मतांशी सहमत होणे एखाद्याला जमणार नाही. मात्र त्यामुळे तत्त्वशास्त्रावरील त्यांच्या अधिकाराविषयी कोणाचे दुमत होण्याचे कारण नाही. आपल्या ग्रंथातून कोणताही ठळक विचारवंत सुटू न देण्याची त्यांनी शिकस्त केली आहे. तरीही मेत्री, हेल्वेशियस, डिडेराँ आणि आताचा टॉफलर यासारखे तत्त्वचिंतक त्यातून सुटले आहेत. मात्र त्यामुळे ग्रंथाचा आवाका आणि मूल्य तसूभरही कमी होणारे नाही. तत्त्वज्ञान हा कोणत्या तरी एका ज्ञातीविशेषाचा विषय आहे अशी बावळट समजूत करून घेणाऱ्यांनी अनेक विद्यापीठांतून त्याच्या अध्ययन-अध्यापनाचे उच्चाटन करण्याचा दुष्टावा कसा केला याचे विवेचन भैरप्पांच्या आत्मचरित्रात आहे. परिणामी तत्त्वज्ञान या नावाचा एक गंभीर विषय आहे आणि जगभरची सगळी महान विद्यापीठे त्याच्या अध्ययनात गुंतली आहेत याची जाणीवही आपल्याकडे आता फारशी उरली नाही. मात्र विचार संपला की कृतीच्या प्रेरणाही संपतात हे लक्षात घेणाऱ्या कोणालाही या विषयाबाबत अनभिज्ञ राहून चालणार नाही. अशा प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा ग्रंथ आहे. विल् डयुरांटने लिहिलेल्या 'हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन'सारखा भव्य प्रयत्न आपल्याकडे झाला नाही. तरीही महामहोपाध्याय काणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, दि.य. देशपांडे, सुरेंद्र बारलिंगे, नरहर कुरुंदकर आणि स.रा. गाडगीळ या सारख्या अभ्यासकांनी तशा लिखाणाची परंपरा राखली. 'आपले विचार विश्व' या ग्रंथाने ती अधिक समृध्द, रोचक व परिपूर्ण केली आहे.

No comments:

Post a Comment